मुंबई । मुंबईतील बेस्ट परिवहन प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्टकडून नोकरी देण्यात येणार आहे. बेस्टमध्ये कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असूनही बेस्ट कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा किंवा मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत किंवा विमा दिला जात नाही. यासाठी बेस्ट संयुक्त कृती समितीनं सोमवारपासून बेस्ट कामगारांना कामावर न येण्याचे आवाहन केले होते. कृती समितीच्या या इशाऱ्यानंतर बेस्ट प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत हा निर्णय घेतला आहे.
बेस्ट कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांची सेवा करत आहेत. यामध्ये अनेक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काहींचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकून मृत पावलेल्या बेस्ट कर्मचा-यांच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्या सेवेत रुजू करून घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत ४ मृत बेस्ट कर्मचा-यांच्या नातेवाईकांस नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. आतापर्यंत कोरोनामुळं ७ बेस्ट कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
— BEST Electricity (@myBESTElectric) May 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”