ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; बेस्ट निवडणुकीत शून्य जागा

uddhav and raj thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हि ठाकरे बधुंची जोडी एकत्र येऊनही काही फायदा झालेला नाही. पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीत उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनलला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल रात्री उशीरा जाहीर झाला. यामध्ये शशांक राव यांच्या पॅनलने 12 जागा जिंकत सत्ता मिळवली. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या महायुती प्रणित समृद्धी पॅनलला 9 जागा मिळाल्या. एकही जागा जिंकता न आल्यामुळे ठाकरे बंधूना मोठा धक्का बसला आहे. तसेच शिवसेनेने आपली ९ वर्षाची सत्ता गमावली आहे.

बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली होती. या युतीने उत्कर्ष पॅनल निवडणुकीत उतरवलं होते. त्यांना आव्हान देण्यासाठी मदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर तिसरीकडे बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव यांनी सुद्धा आपले २१ उमेदवार रिंगणात उतरवले होते. हि निवडणूक एकुण 35 केंद्रावर पार पडली. तब्बल 150 उमेदवार रिंगणार होते. या तिरंगी लढतीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला.

ठाकरे बंधुंच्या पराभवानंतर भाजप अक्षरशः तुटून पडली. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत ठाकरेंना डिवचलं आहे. एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?… या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!! असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.