हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हॉकी संघाने काल टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5 – 4 असा विजय मिळवला. याचा आनंद हॉकी खेळाडूंकडून सर्वत्र साजरा केला जात आहे. दरम्यान, आज कोल्हापुरातील हॉकी खेळाडूंनी हलगीच्या तालावर नृत्य करत आणि एकमेकांना गुलाल लावत जल्लोष साजरा केला. तसेच भारतीय टीमला यावेळी शुभेच्छाही दिल्या.
टोक्योतील एस्ट्रो टर्फवर काल भारतीय संघाने इतिहास रचत 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक जिंकले. काहीही करुन आजचा सामना जिंकायचाच, असा निश्चय भारतीय संघाने केला होता. त्यानुसार तिसऱ्या क्वार्टरची सुरुवात भारतीय संघाने जबरदस्त केली. सामन्याच्या 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंगने गोल केला. तिथेच भारताला आघाडी मिळाली. लगेचच 5 मिनिटांनी सिमरनजीतने गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली. सरतेशेवटी कांस्य पदकाच्या सामन्यात भारताने जर्मनीला 5 – 4 ने पराभूत करुन विजय मिळवला.
भारतीय हॉकी टीमने मिळवलेल्या विजयाचा महाराष्ट्र राज्यातील हॉकी खेळाडूंकडूनही आनंद साजरा केला जात आहे. फटाके वाजत्व, पेढे वाटून जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, यामध्ये वेगळ्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील हॉकी खेळाडूंनी आनंद साजरा केला. त्यांनी हलगीच्या तालावर नृत्य करत आणि एकमेकांना गुलाल लावत भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या.