हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचं वारं असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये सट्टेबाजी (Betting in Cricket) सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलाय. धक्कादायक बाब म्हणजे या सट्टेबाजीत मुंबई पोलिसांचाही सहभाग असल्याचे म्हणत दानवे यांनी खळबळ उडवून दिलीय. ते विधान परिषदेत बोलत होते.. यावेळी अंबादास दानवे यांनी अध्यक्षांना एक पेन ड्राइव्ह सुद्धा दिला. त्यात पाकिस्तानी लोकांसोबतचे संभाषण असून मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची त्यांना मदत होते, याबाबतची माहिती दिली आहे.
अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात बेटिंग झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केली. त्यानंतर आता इंडियन प्रिमियर लीगच्या सामन्यांमध्येही सट्टा लावण्यासाठी मुंबईत बैठका झाल्याचे अंबादास दानवे म्हणाले. यामध्ये मुंबई पोलिसांच्या बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. लोटस् २४ नावाचे क्रिकेट बेटिंग अॅप आहे. यातील मेहुल जैन, हिरेन जैन आणि कमलेश जैन हे बेटिंग करतात. पाकिस्तानातल्या लोकांची खेळाडूंची यांचे संबंध आहेत आणि संपर्कात सुद्धा आहेत. ते खुलेआम मुंबईतल्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक करतात. चॅम्पियन ट्रॉफी संपल्यानंतर आता आयपीएलसाठी ते दुबईवरून मुंबईत आले आहेत.
या पेन ड्राइव्हमध्ये त्यांनी पाकिस्तानात बॅटिंगसाठी काय काय केलेलं आहे हे तुम्ही ऐका. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेतले आहे ते तुम्ही तपासा. खुलेआम पोलिसांच्या मदतीने अशा प्रकारच्या घटना या राज्यात घडत आहेत,” असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. सभापती राम शिंदे यांना दिलेल्या पेन ड्राईव्हमध्ये पाकिस्तानी लोकांसोबतचे संभाषण असून यामध्ये कशाप्रकारे मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची मदत होते? याबाबत माहिती सभागृहात दिली आहे. अंबादास दानवे यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे.