फक्त टॅक्स वाचवण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल तर सावधान; होऊ शकेल मोठे नुकसान

नवी दिल्ली । बरीच लोकं फक्त टॅक्स वाचवण्यासाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतात. त्यांचा एजंट सांगतो की, जर तुम्ही पॉलिसी काढली तर टॅक्सच्या स्वरूपात मोठी बचत होईल. जर तुमचा एजंट देखील तुम्हाला इन्शुरन्सच्या जाळ्यात ओढत असेल तर अजिबात घाई करू नका.

वास्तविक, इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमवर वार्षिक 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. याची मदत घेऊन इन्शुरन्स एजंट तुमच्यावर प्रीमियमचा मोठा बोझा लादतात. तुम्ही देखील याची जाणीव ठेवावी आणि इतर टॅक्स बचतीचा पर्याय शोधा. असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत, जे तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा जास्त रिटर्न देतात. इन्शुरन्स पॉलिसींची किंमत देखील जास्त आहे, ज्यामुळे रिटर्न 4-5 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे.

जानेवारी-मार्चमध्ये सर्वाधिक दाब येतो
जानेवारी-मार्चमध्ये पॉलिसी विकण्यासाठी इन्शुरन्स एजंटांवर त्यांच्या कंपन्यांचा सर्वाधिक दबाव असतो. करदातेही गुंतवणूक करण्याच्या घाईत इन्शुरन्स पॉलिसी घेतात, ज्याची त्यांना गरजही नसते. BankBazaar.com चे सीईओ आदिल शेट्टी म्हणतात की,” इन्शुरन्स पॉलिसी तुमची जोखीम कव्हर करण्यासाठी आहे. याकडे करबचतीचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ नये.”

तुम्ही येथे गुंतवणूक करून इन्शुरन्स पेक्षा जास्त रिटर्न मिळवू शकता
सरकारने ऑफर केलेल्या अनेक बचत योजना इन्शुरन्स पॉलिसीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त रिटर्न देतात. यामध्ये तुम्हाला 80C अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. लोकप्रिय योजना सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6%, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) वर 7.1% आणि नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट (NSC) वर 6.8% रिटर्न देत आहेत. याशिवाय इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) सारख्या म्युच्युअल फंड योजनांना देखील 1.5 लाखांची टॅक्स सूट मिळते आणि 10 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊ शकतो.