भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट; घरवापसीच्या चर्चाना उधाण

bhagirath bhalke sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामती येथील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत भगीरथ भालके यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या घरवापसीच्या चर्चाना उधाण आलं आहे. कारण भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

खरं तर भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर भालके यांनी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदावरा प्रणिती शिंदे यांचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच आज त्यांनी थेट गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आलं आहे. आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक भालके तुतारीच्या चिन्हावर लढवणार का याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष्य लागलं आहे.

पंढरपुरातील राजकारण बरच बदललं –

दरम्यान, मधल्या काही काळात पंढरपुरातील राजकारण बरच बदललं आहे. जेव्हा भगीरथ भालके यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला तेव्हा शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील हे राष्ट्रवादीच्या आणि शरद पवारांच्या अगदी जवळ गेले. पवार गटाकडून अभिजित पाटील यांनाच पंढरपूर विधानसभेचं तिकीट मिळेल असेही म्हंटल जात होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या काळात अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते शरद पवार आणि त्यांच्या पक्षापासून लांब गेले. याच दरम्यान भगीरथ भालके यांनी अचूक टायमिंग साधत शरद पवारांची भेट घेतल्याने आता भालके तुतारीवर निवडणूक लढणार का ते पाहावं लागेल.