हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात धडकणार आहे. येत्या 15 आणि 16 मार्चला राहुल गांधी ठाण्यात येतील. यावेळी त्यांची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे. महाराष्ट्र्रातील एकूण राजकीय परिस्थिती आणि आगामी लोकसभा निवडणुका यावरून राहुल गांधी नेमकं काय बोलतात याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देशातील गरीब जनतेशी संवाद साधत आहेत, त्यांच्या भावना, व्यथा जाणून घेत आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही 12 मार्चला गुजरातमधून महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक मार्गे ती १५ मार्चला वाडा, भिवंडी येथे येईल. दि. 15 आणि 16 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा यात्रा ठाणे धडकेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या या ठाण्यात राहुल गांधी जाहीर सभा घेऊन उपस्थितांना संभोधित सुद्धा करतील. यानंतर हि यात्रा अशीच पुढे जाऊन १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.
राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान, नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होते. तसेच राहुल गांधी महाविकास आघाडीच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठया उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे