हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोयना प्रकल्पग्रस्तांचे गेली महिनाभरापासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे न घेता एक महिनाभर सुटी घेण्याचा निर्णय उपस्थित आंदोलकांनी हातवर करून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक न झाल्यास पुन्हा राज्यभर आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर 27 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी महिनाभरात बैठकीचे पत्र देताना आंदोलन मागे घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी आंदोलन मागे न घेता एक महिनाभर आंदोलनाला सुटी घेण्याचा निर्णय घेतला.
पालकमंत्री देसाईंच्या बैठकीनंतर डाॅ. पाटणकर म्हणाले, “7 लाख 312 प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रात आहेत. त्यांना उद्ध्वस्त करणारे कब्जे हक्कांची किंमत व मिळालेल्या जमिनीवर व्याज वसुलीचे शासन निर्णय होते. या दोन शासन निर्णय दुरूस्ती, इतर प्रकल्पांप्रमाणे कोयनेला नियोजन आराखडा, घर बांधणी अनुदान पात्र खातेदार, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे, तारळी प्रकल्पग्रस्तांच्या घराशेजारील गायरान व महसूल पड जमिनी देणे आदी निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत होणार आहेत. यामुळे आंदोलनाला न आलेल्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे.