भारत विकास परिषदे तर्फे राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता 2018 संपन्न 

MG
MG
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे |समिर रानडे

भारत विकास परिषदेच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता २०१८ ची दुसरी फेरी नुकतीच बीएनसीए सभागृह येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेने केले होते.

या स्पर्धेत बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कुल, कोथरूड शाळेला विजेतेपद मिळाले आहे. विजेता संघ ७ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई येथे होणार्‍या क्षेत्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. विजेत्या संघाला ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय क्रमांक अशोका युनिव्हर्सल स्कुल, चांसी, नाशिक आणि तृतीय क्रमांक विस्डम हायस्कुल इंटरनॅशनल स्कुल, नाशिक यांना मिळाला.

राष्ट्रभावना वाढीस लागण्यासाठी दरवर्षी आयोजण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय समुहगान स्पर्धेत पश्‍चिम महाराष्ट्रातील १६ शाळांचे संघ सहभागी झाले होते. ६ वी ते ‍१० वीचे १६० विद्यार्थ्यांनी यांत सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रत्येक संघाने हिंदी व संस्कृत भाषेत गाणे सादर केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द गायिका सायली पानसे उपस्थित होत्या. याबरोबरच राष्ट्रीय समुहगान स्पर्धेचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताजी चितळे, पश्चिम क्षेत्राचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग, पश्चिम क्षेत्राच्या संस्कार विभागाच्या सचिव सारिका पेंडसे, पश्चिम क्षेत्राच्या सेवा विभागाचे सचिव सचिन गांजवे, शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष जगदीश धोंगडे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव अजय लोखंडे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष शशिकांत पद्ममवार, संयोजिका माधुरी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोग यांनी केले तर शिवाजीनगर शाखेचे खजिनदार अमित ठक्कर यांनी आभार मानले. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून संगीत क्षेत्रातील मान्यवर आसावरी गोडबोले, भाग्यश्री अभ्यंकर आणि प्रफुल देशपांडे यांनी काम पाहिले.