मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांचा ५ वा स्मृतीदिन; राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा वाढवलेले खरे भारतरत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । छोटी स्वप्नं पाहणं गुन्हा आहे असं देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला, नागरिकांना बजावून सांगणाऱ्या भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांचा आज ५ वा स्मृतिदिन. मुलांशी संवाद साधण्यात जीवनातील धन्यता मानणाऱ्या अब्दुल कलाम यांचा मृत्यू विद्यार्थ्यांसमोर भाषण करतानाच व्हावा हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल.

अवुल पाकिर जैनूलाबदीन अब्दुल कलाम हे कलामांचं पूर्ण नाव. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरमध्ये जन्म झालेल्या कलाम यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपलं शिक्षण पूर्ण केलं. साधी राहणी कायम अंगी बनलेल्या कलाम यांनी लहान वयातच वृत्तपत्र विक्रीचा व्यवसायही केला होता.

मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनीयरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी संरक्षण संशोधन विकास संस्थेमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतीय लष्करासाठी हॅलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले. कलाम यांना करीयरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. १९६३ साली कलाम यांनी नासा या जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्थेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही-३ या प्रकल्पांवर काम सुरु केले. हे दोन्ही प्रोजेक्ट यशस्वी झाले.

भारताचे तात्कालिक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाने पोखरण येथे दुसरी अणूस्फोटाची चाचणी केली. या चाचणीत कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. या चाचणीनंतर देशातील आघाडीचे अणवस्त्र शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन म्हणून लोक त्यांना ओळखू लागले. १९९२ ते १९९९ या कालावधीत अब्दुल कलाम देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते. पोखरण अणू चाचणीच्यावेळी राजकीय आणि तांत्रिक दोन्ही आघाडयांवर त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २००२ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले. २५ जून रोजी त्यांनी देशाचे ११ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील सर्व दिवे सौरऊर्जेवर चालवण्यासाठी कलाम यांनी आराखडा तयार केला होता. पण या योजनेवर अंमलबजावणी करण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. सौरऊर्जेशिवाय भारताने आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणूऊर्जा आणि बायोफ्युल तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा असे त्यांचे मत होते.अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते.

अब्दुल कलाम यांना लहान मुलांची आवड होती. ही लहान मुलेच उद्याची भविष्य आहेत. त्यामुळे ते जास्तीत जास्तवेळ मुलांसोबत घालवायचे. त्यांच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे द्यायचे. राष्ट्रपती भवनात असताना स्वतःच्या पाहुण्यांचा खर्च स्वतः करणे, एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वेगळी खुर्ची बसायला दिली तर न घेणे, निवृत्तीनंतरही ज्ञानदानाच्या कामात अखंड कार्यरत राहणे या गोष्टींमुळे कलाम हे नेहमीच लोकांना आपलेसे वाटले.

राजकारणापलीकडे जाऊन देशाला महासत्ता बनवण्यासाठी कलामांनी दिलेल्या व्हिजन २०२० चा देशातील अनेकांना आज विसर पडला आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न नव्याने करूया हीच त्यांना खरी श्रद्धांजली..!!

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.