हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । शिवसेना आमदार भास्कर जाधव आज पुन्हा एकदा विधानसभेत आक्रमक रूपात पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी खाली बसून बोलणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. सुनील प्रभू आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील प्रश्नोत्तर दरम्यान हा प्रकार घडला. मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, अशी विनंती यावेळी भास्कर जाधव अध्यक्षांना केली.
नेमकं काय घडलं-
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर सरकारच्या वतीने मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच कोकणातील सर्व आमदारांसहित या रस्त्याची पाहणी करून त्यावर तातडीची उपाययोजना केली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी या चर्चेत कोकणचे आमदार म्हणून भास्कर जाधव यांनीही उडी घेतली. मी या विषयावर सतत प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही थकलो… मात्र शासनाचे अधिकारी तीच तीच उत्तरे देताना थकत नाहीत. त्याला बारा वर्षे झाली अशा शब्दात भास्कर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
भास्कर जाधव पुढे बोलत असताना नितेश राणे खाली बसून मधेच बोलू लागले. तसेच यामध्ये मधली अडीच वर्षे वाया गेली असा टोला लगावत त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं. त्यानंतर भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. मला तुमच्याकडून काहीही सल्ला नको. मी मंत्र्यांशी बोलतो आहे, तुमच्याशी नाही, अशा शब्दात त्यांनी नितेश राणे यांना फटकारलं. तसेच मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, अशी विनंती यावेळी भास्कर जाधव अध्यक्षांना केली.