हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य जणू हिरवा शालू ओढलेल्या नवंवधूसारखे खुललेले असते. त्यात महाबळेश्वर आणि पाचगणी येथील परिसर म्हणजे निसर्गाची किमयाच. यामुळे ऐन पावसाच्यावेळी हा संपूर्ण परिसर इतका मनोवेधक आणि नजरेचं पारणं फेडणारा असतो कि या निसर्गाची शाल अंगावर घेऊन यातच विरून जावंस वाटत. असच काहीस तुमच्या आमच्या लाडक्या भाऊचंही झालं. काही कामानिमित्त या परिसरात येऊन धडकलेला भाऊ आला आणि इथलाच होऊन गेला. ड्रमायन, या परिसरातील निसर्ग इतका विलोभनीय, मनाला भुरळ पाडणारा आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा देणारा आहे कि तुम्ही याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्याने आपल्या चाहत्यांना केले आहे.
चला हवा येऊद्या फेम प्रसिद्ध कलाकार व रसिक प्रेक्षकांचा आवडता कलाकार भाऊ कदम काही कामानिमित्त साताऱ्यातील महाबळेशवरच्या भागात येऊन पोहोचला आणि इथल्या निसर्गाने जणू त्याला भुरळच घातली. त्याच्या येण्याची खबर महाबळेश्वर नाट्यपरिषदेच्या पदाधिकारी तसेच पत्रकारांना कळल्यावर त्यांनी त्याचा मागोसा घेत त्याची भेट घेतली. यावेळी नाट्य परिषदेच्या वतीने व पत्रकारांच्या वतीने त्याचे फुलदाणी देवून स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील पावसाळी निसर्ग सौंदर्य पाहिल्या नंतर त्यांनी आपल्या चाहत्यांना या निसर्गाचा जरूर लाभ घ्या असे आवाहन केले. यावेळी महाबळेश्वर नाट्यपरिषद पदाधिकारी तसेच पत्रकार विलास काळे, संजय दस्तुरे, अभिजित खुरासणे, प्रेषित गांधी, रोहित ढेबे, संदीप मोरे, गणेश ढेबे, अनिकेत आदि उपस्थित होते.
दरम्यान या धावत्या भेटीत परिषदेचे पदाधिकारी व पत्रकार यांच्या बरोबर अनौपचारिक गप्पा मारताना कलाकार भाऊ कदम याने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले कि, आपल्याला हा परिसर व येथील निसर्ग नेहमीच भुरळ पाडत असतो. सध्याचे या दोन्ही पर्यटनस्थळांवरील पावसाळी वातावरण व या परिसरातून दिसणारी पावसाळी निसर्गाची विलोभनीय दृश्ये अत्यंत मोहक, मनाला भुरळ पाडणारी व अविस्मरणीय आहेत.
त्याचाच मोह झाल्याने काही वेळ मी येथे घालविला अगदी तसाच इतर निसर्ग प्रेमींनी ही आपल्या सोयीनुसार कोरोनाचे सावट संपल्यावर येथे जरूर यावे आणि निसर्गाचा आस्वाद लुटावा आणि आजच्या धावपळीच्या जीवनात येथून नव चैतन्य घेवून जावे. महाबळेश्वर नाट्य परिषदेने भविष्यात कधी नाट्य संमेलन आयोजित केले तर महाबळेश्वर पाचगणी रसिक प्रेमिंसाठी व रसिकांसाठी आपण अवश्य सहकार्य करू, अशी खात्रीदेखील भाऊ कदमने पदाधिकाऱ्यांना दिली.