हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २१ व्या शतकातही अंधश्रद्धेला बळी पडणारे लोक आणि त्यांना फसवणारे भोंदूबाबा यांचं प्रस्थ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. करणी काढण्याच्या आणि सोन्यात गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने वाई तालुक्यातील कुटुंबाला 21 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली. गणेश विठोबा शिंदे असे या भोंदू बाबाचे नाव आहे.
पीडित कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतल्यावर हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत वाई पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. त्याची दखल घेत गुन्हे शाखेने समांतर तपास करून 12 तासांत या भोंदू बाबाला गजाआड केले.
गणेश शिंदे हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील चांदवडी (पुनर्वसन) येथे राहतो. अघोरी विद्या येत असून करणी काढून देण्याच्या बहाण्याने तो सामान्य नागरिकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक लूट करतो. नोकरी लावणे, सोने दुप्पट करून देणे या बहाण्यानेही त्याने मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील शेकडो जणांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.