हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राजकीय वर्तुळात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी दोघांमध्ये तब्बल अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीविषयी प्रतिक्रिया देखील दिली. यावेळी बोलताना त्यांनी, ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची, गोरगरीबांची घरं पेटता कामा नयेत, राज्य शांत राहिलं पाहिजे, असे वक्तव्य केले.
पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “मी शरद पवारांची अपॉईंटमेंट घेतली नव्हती. पण, तरी त्यांना भेटायला गेलो. तब्येत ठीक नसल्याने ते झोपले होते. मी दीड तास थांबलो. ते उठल्यानंतर मी गेलो आणि आमच्यात दीड तास चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की, राजकारण घेऊन आलो नाही. आमदार-मंत्री म्हणून आलो नाही. पण, राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. पण, आता राज्यात काही ठिकाणी स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे, असं मी त्यांना सांगितलं”
ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे..
तसेच, “सध्या काहीजण मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही, तर काहीजण हे ओबीसी, धनगर, वंजारी या समाजांच्या दुकानात जात नाहीत. ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की, राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबतही स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. तुमची भूमिका महत्त्वाची आहे, यावर शरद पवार म्हणाले की, दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलतो. काय झालं, काय करायला पाहिजे, यावर चर्चा करायला तयार आहे” अशी अशी माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.