हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ड्रीम 11 गेममध्ये दीड कोटी जिंकणे पिंपरी चिंचवडचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना महागात पडले आहे. कारण, आता सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विनॉयकुमार चोबेंच्या आदेशानुसार, गठीत करण्यात आलेल्या समितीने ही कारवाई केली आहे. ऑन ड्युटी असताना देखील खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा ठपका सोमनाथ झेंडे यांच्यावर लावण्यात आला आहे.
त्यामुळे आता एकीकडे दीड कोटी जिंकले असताना देखील पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सोमनाथ झेंडे यांची झोप उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांमध्ये ड्रीम 11 गेमवर बंदी आणली गेली आहे. या खेळाला सट्टेबाजी म्हणून देखील पाहिजे जाते. मुख्य म्हणजे, पोलीस खात्यात काम करणाऱ्या कर्मचारी किंवा अधिकारांच्या उत्पन्नाचे साधन कायदेशीर असावेत असा नियम आहे. त्याचबरोबर कोणत्याही खेळ प्रकारात भाग घेताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे देखील प्रत्येक अधिकाऱ्यासाठी बंधनकारक आहे.
मात्र, ड्रीम 11 गेममध्ये भाग घेताना झेंडे यांनी कोणत्याही अधिकाऱ्याकडून परवानगी घेतलेली नव्हती. विशेष म्हणजे ऑन ड्युटी असताना त्यांनी ड्रीम 11 गेममध्ये सहभाग नोंदवला. ज्यामुळेच त्यांच्यावर गैर वर्तणुकीची कृती असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, ऑन ड्युटी असताना झेंडे यांनी पोलीस विभागाचे नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर झेंडे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “अनेकजण हा खेळ खेळतात. एक क्रीडाप्रकार आहे. तासनतास खेळतात. हा खेळ तसा जुगार नाही. पण तरीही माझ्यावर कारवाई होत आहे. कारवाईबाबत अद्याप मला कोणी कळवले नाही. नोटीस आलेली नाही. अधिकाऱ्यांना माझी बाजू सांगितली आहे. पण माझ्यावर अन्याय होत आहे”