हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेला आणि सातारा जिल्ह्यातील महत्वाचा असलेला फलटण-पंढरपूर नवीन ब्राॅडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयाच्यावतीने पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच १०५ किलोमीटरच्या या मार्गासाठी राज्य शासनाकडून ९२१ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत.
फलटण-पंढरपूर नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाबाबत नेहमीच चर्चा सुरू आहे. त्यातच लोणंद-फलटण रेल्वेमार्ग तयार होऊन त्यावरुन रेल्वेही धावली. पण, पंढरपूर मार्गाबाबत उदासिनता दिसून आली. आता मात्र, फलटण-पंढरपूर नवीन ब्राॅडगेज रेल्वेमार्गासाठी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
या प्रयत्नातूनच मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत काही निर्णय घेण्यात आले. कारण, या मार्गासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) १ हजार ८४२ कोटी खर्चाचा अहवाल तयार केला आहे. यात राज्याचा सहभाग ९२१ कोटींचा आहे. हा निधी टप्प्याटप्पयाने उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पण, हा रेल्वेमार्ग आता महारेलएेवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाला गती येणार आहे.