सांगली | कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे पात्राबाहेर पडलेल्या मगरी आता पुन्हा पात्राकडे परतू लागले आहेत. पलूस तालुक्यातील आमणापूर येथे नदीकडे परतणाऱ्या मगरींनी अनेकदा नागरिकांची वाट अडवली. आमणापूर ते सांगली दरम्यान नदीकाठावर मगरींचा वावर वाढला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सांगलीतील शेरीनाला परिसरात अजस्त्र मगरीचे दर्शन झाल्याने पोहायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीत गेल्या पंधरा वर्षांपासून मगरींचा वावर वाढला आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर, भिलवडी, औदुंबर परिसरात अनेकदा मगरींकडून लोकांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून या मगरी नदीकडे परतत आहेत. रात्रीच्या वेळी परतणाऱ्या मगरींनी अनेकदा नागरिकांची वाट अडवली. सांगलीतील शेरीनाला परिसरात मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अजस्र मगरीचे दर्शन झाले.
नदीपात्रात मुक्त विहार करणारी ही मगर काही काळ काठावर येऊन थांबली होती. मगर दिसताच पोहण्यासाठी पात्रात गेलेले लोक बाहेर पडले. अनेकांनी मगरीला मोबाईलमध्ये चित्रीत केले. मगरींचा मुक्तवावर वाढत असल्याने नदीकाठावरील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.