हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये भारतातील दोन दिग्गज कंपन्यांकडून बनवण्यात येणाऱ्या 4 मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांमध्ये इथिलन ऑक्साईड (Ethylene Oxide) किटकनाशकाचे प्रमाण अधिक असल्याने कर्करोग (Cancer) होण्याचा धोका आहे, असा दावा या देशाकडून करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, या देशांनी घेतलेल्या भूमिकेनंतर भारत सरकारने त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत रिपोर्ट पाठवण्याचे निर्देश दिले आहे. यासह ज्या कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे त्या कंपन्यांना ही सविस्तर अहवाल मागवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वाणिज्य मंत्रालयाने सिंगापूर आणि हाँगकाँग या दोन्ही देशांना त्यांनी मसाल्यांवर घातलेल्या बंदीबाबत एक रिपोर्ट सादर करावा असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर ज्या कंपनीच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे त्या कंपन्यांना आपले मत मांडण्याचे आणि सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. सिंगापूर आणि हाँगकाँग या दोन्ही देशांच्या दूतावासांना भारत सरकारने त्यांनी केलेल्या कारवाईसंदर्भात रिपोर्ट सादर करावे अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता हे रिपोर्ट आल्यानंतर मसाल्यांवर बंदी घातल्याची प्रमुख कारणे समोर येणार आहेत.
दरम्यान, सिंगापूर आणि हाँगकाँग या देशाने भारतातील सुप्रसिद्ध असणाऱ्या MDH आणि एव्हरेस्ट कंपन्यांच्या चार मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ज्यात मद्रास करी पावडर, मिश्रित मसाला पावडर, सांबर मसाला तसेच फिश करी या मसाल्यांचा समावेश आहे. या मसाल्यांमध्येच इथिलन ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्याचा दावा या देशांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे MDH आणि एव्हरेस्ट कंपन्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. तसेच, संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या MDH आणि एव्हरेस्ट कंपनीच्या मसाल्यामुळे खरंच कर्करोग होऊ शकतो का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे