बिग फाईट्स – महाराष्ट्रातील ‘या’ ६ जागांकडे सगळ्या जनतेचं लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होतील. निकालानंतर कुणाची दिवाळी साजरी होणार आणि कुणाचं दिवाळ निघणार हे स्पष्ट होईलच. वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल असं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत राज्यातील काही भागांत घटलेली मतदानाची टक्केवारीसुद्धा मतदारांमधील निराशा दाखवून देत असताना राज्यातील काही जागांबाबत मात्र जनतेने विशेष रस घेतल्याचं पहायला मिळत आहे. या ६ जागांपैकी ५ जागा पश्चिम महाराष्ट्रातीलच आहेत. याचं कारण हे शरद पवार या एका व्यक्तिभोवती फिरतंय का? हे खालील माहिती वाचून तुम्हांला समजेलच..!!

१) कर्जत-जामखेड – भाजपचे महत्त्वाचे नेते राम शिंदे यांना खिंडीत पकडण्याचं धोरण राबवत शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी २ वर्ष आधीच तयारी करत हा मतदारसंघ पिंजून काढला. विद्यमान आमदारांनी न केलेली कामं त्यांनी लोकांमध्ये मिसळून करून देण्याचा सपाटा लावला. राम शिंदेंनीही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना सोबत घेत आपला गड वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

२) कोल्हापूर दक्षिण – आमचं ठरलंय हे लोकप्रिय वाक्य उच्चारत सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपासून वातावरणात रंग भरायला सुरुवात केली. मित्रपक्षाचा उमेदवार जड झाला की त्याला पाडायचं अशीच भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली. गेल्या विधानसभेला याचा दणका सतेज पाटलांना बसला तर या लोकसभेला धनंजय महाडिकांना. यावेळी कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांच्यापुढे सतेज पाटलांचा पुतण्या ऋतुराज पाटील यांनी तगडं आव्हान उभं केलं आहे. आता या पाडापाडीत कोण जिंकणार हे पाहणं रंजक असणार आहे.

३) कोथरुड – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांमधून निवडून या असा सल्ला दिला आणि चंद्रकांत पाटलांनी त्याची अंमलबजावणी केली. गिरीश बापट खासदार झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं पुण्यात येणं म्हणजेच त्यांच्या नव्या इनिंगची सुरुवात मानली गेली होती. अशा परिस्थितीत स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध शमवत चंद्रकांतदादा उभे राहिले. मनसेच्या किशोर शिंदे, ज्यांनी मागील २० वर्षांपासून कोथरूडच्या स्थानिक राजकारणात लक्ष घातलं – चंद्रकांत पाटलांना आव्हान द्यायचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना इतर सर्व विरोधी पक्षांनी सहकार्य केलं. स्थानिक विरुद्ध बाहेरचा असं स्वरूपही या लढतीला देण्यात आलं. आता मजबूत पक्षसंघटन जिंकणार की विरोधकांची एकी ते लवकरच लक्षात येईल.

४) कराड दक्षिण – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अतुल भोसलेंनी संस्थात्मक बळाचा, राज्यस्तरीय आणि केंद्रीय यंत्रणेचा फायदा घेत सर्व ताकद पणाला लावली आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या आधी ३५ वर्ष कराड दक्षिणवर राज्य केलेल्या विलासकाका उंडाळकर यांनी आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. तिन्ही उमेदवारांकडे हक्काची ५० हजार मते आहेतच, जिंकून येण्यासाठी आवश्यक असलेली ज्यादा मते कोण घेणार याकडेच सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

५) कणकवली – सेना-भाजप युती झाली तरी नारायण राणेंवर आपला पूर्वीपासूनचा राग धरून असलेल्या शिवसेनेने सतिश सावंत यांना नितेश राणेंविरुद्ध उभं करून वेगळी खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणात आपलं बस्तान बसवण्यासाठी भाजपने राणेंना सोबत तर घेतलं आहे पण ते वरवर की मनापासून हे या निवडणूक निकालानंतरच समजेल.

६) माण-खटाव – दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध असणारा माण-खटाव काँग्रेसमधल्या बंडखोरीमुळे प्रकाशझोतात आला आहे. मागील १० वर्ष कोणताही विरोधक समोर असला तरी त्याला न जुमानणाऱ्या जयकुमार गोरे यांना यंदाच्या निवडणुकीत तगडे आव्हान मिळालं आहे. आपल्याच कुटुंबातील शेखर गोरेंशी झुंज देत सत्तेचा चेंडू आपल्याकडे ठेवण्यात जयकुमार गोरे २ वेळा यशस्वी झाले होते. यंदा मात्र भाजपमधील नाराज गटासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी एकत्र येत प्रभाकर देशमुखांना ताकद दिली आहे. ही ताकद किती चालणार हे २४ तारखेला स्पष्ट होईलच.

तर या आहेत महाराष्ट्रातील ६ बिग फाईट्स, तुमच्या मनात पण असतीलच यातल्या काही..!! बघूया काय होतंय आता..!!

Leave a Comment