नवी दिल्ली । शनिवारी क्रिप्टोकरन्सीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत क्रिप्टोकरन्सीशी संबंधित वाढत्या चिंतांवर चर्चा करण्यात आली. खोटी आश्वासने देऊन आणि पैशाचे आमिष दाखवून तरुणांची दिशाभूल करण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचे सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. या बैठकीत, सरकार क्रिप्टोकरन्सीसंदर्भात तज्ञ आणि भागधारकांशी चर्चा करत राहील, असा निर्णय घेण्यात आला. फ्लोटिंग क्रिप्टो मार्केटला मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगचे हत्यार बनू दिले जाणार नाही यावरही या बैठकीत चर्चा झाली. रिझर्व्ह बँक, अर्थ मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त सल्लामसलत प्रक्रियेनंतर ही बैठक झाली, ज्यामध्ये मंत्रालयांनी क्रिप्टोकरन्सीसंदर्भात विविध देश आणि जगभरातील तज्ञांचा सल्ला घेतला.
भविष्यातील धोके काय आहेत ?
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत जगभरातील क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील निर्णय आणि पद्धतींवरही चर्चा झाली. तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीची वाढती क्रेझ आणि मोठमोठी आश्वासने देणाऱ्या जाहिराती थांबवल्या पाहिजेत, यावर भर देण्यात आला. तसेच, अनियंत्रित क्रिप्टो मार्केटला मनी लाँड्रिंग आणि दहशतवादासाठी वित्तपुरवठा करण्याची संधी बनण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
सरकारचा असा विश्वास आहे की, क्रिप्टोकरन्सी हे सतत विकसित होत असलेले तंत्रज्ञान आहे, त्यामुळे त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सावधगिरीची पावले उचलली जातील. या बैठकीत सरकार या प्रश्नावर जी काही पावले उचलेल, ती पुरोगामी आणि भविष्य डोळ्यासमोर ठेवून उचलली जाईल, असे सर्वसाधारण मत आहे. या प्रकरणात, सरकार तज्ञ आणि इतर भागधारकांशी संवाद साधत राहील. ही बाब देशांच्या सीमेपलीकडे असल्याने जागतिक भागीदारी आणि सामायिक धोरणही बनवले जाईल.