अयोध्येत नव्हे तर याठिकाणी बांधण्यात येणार जगातील सर्वात मोठं राम मंदिर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र अयोध्येतील राम मंदिराची चर्चा सुरु आहे. २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष्य अयोध्येकडे लागले आहेत. पण तुम्हाला माहितेय का?? जगातील सर्वात मोठं राम मंदिर अयोध्येत नव्हे तर ऑस्ट्रेलिया मधील पर्थ मध्ये उभारण्यात येणार आहे. हे मंदिर तब्बल ७२१ फूट उंच असेल. श्रीराम वैदिक अँड कल्चरल ट्रस्टच्या नेतृत्वाखालील, सुमारे 600 कोटी रुपये खर्चाचा हा स्मारक प्रकल्प 150 एकरांवर पसरलेला असेल.

श्री सीताराम ट्रस्टचे उपप्रमुख डॉ. हरेंद्र राणा म्हणाले की, पर्थ शहरातील 150 एकर जागेवर 600 कोटी रुपये खर्चून श्री राम मंदिर बांधले जाणार आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.दिलावर सिंग हे गेल्या 35 वर्षांपासून ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहेत. हे मंदिर सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामुदायिक क्रियाकलापांचा समावेश असलेले बहुआयामी केंद्र असेल.

मंदिरात खास काय असेल??

पर्थ मध्ये उभारण्यात येणाऱ्या या राम मंदिर परिसरात हनुमान वाटिका, सीता वाटिका, जटायू बाग, शबरी वन, जामवंत सदन, नल नील टेक्निकल आणि गुरु वशिष्ठ नॉलेज सेंटर असेल.

मंदिर परिसरात ५५ एकर जागेवर सनातन वैदिक विद्यापीठ उभारले जाणार आहे. हनुमान वाटिकेत १०८ फूट उंचीची हनुमानजींची मूर्ती स्थापन केली जाणार आहे.

तसेच या संपूर्ण परिसरात शिव सप्तसागर नावाचा तलाव बांधण्यात येणार असून, त्यामध्ये भगवान शंभो महादेवाची ५१ फुटांची मूर्ती असेल. मंदिरात योग न्यायालय, ध्यान न्यायालय, वेद अध्यापन केंद्र, संशोधन केंद्र आणि एक संग्रहालय यासह आध्यात्मिक जागा असतील.

मंदिरात तंत्रज्ञान उद्यानासारख्या क्षेत्रासह काही तांत्रिक बाबींचाही समावेश असेल. वैदिक ग्रंथांच्या अभ्यास आणि प्रचारासाठी वाल्मिकी केंद्रही बांधले जाईल.

मंदिराच्या बांधकामात ‘झिरो कार्बन फूटप्रिंट’ची विशेष काळजी घेतली जाईल, असे ट्रस्टने सांगितले. जैव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचाही या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.