पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जदयूमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारच्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची निराशा झाली. गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपाने तिथे एका बिहारच्या निवृत्त पोलीस हवालदाराला उमेदवारी दिली आहे. बक्सरमधील भाजपाचे उमेदवार परशुराम चतुर्वेदी यांनी माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना मागे टाकत ही उमेदवारी मिळवली आहे अशी चर्चा सुरू आहे.
“गुप्तेश्वर पांडे हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांच्या आदरपूर्वक पाया पडतो आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात आपुलकीशिवाय काहीच नाही” असे चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी भाजपाचे आभार देखील मानले. बिहार पोलिसात असताना चतुर्वेदी यांनी सीआयडीसह अनेक विभागात काम केले आहे. “मी काम केलेल्या प्रत्येक ठिकाणी माझा आदर होता. कामाच्या ठिकाणी मी खूप मेहनती व प्रामाणिक होतो. या अनुभवांमुळे मला राजकारणात मदत मिळाली”, असे चतुर्वेदी म्हणाले.
दरम्यान, पांडे यांनी मनातील खंत फेसबुक पोस्टद्वारे बोलून दाखवली आहे.“माझ्या शुभचिंतकांच्या फोनमुळे त्रस्त झालो आहे. मी त्यांची चिंता आणि समस्या समजू शकतो. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सगळ्यांना अपेक्षा होती की, मी निवडणूक लढवेल. पण यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. हताश आणि नाराज होण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. संयम ठेवा. माझं जीवन संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर जनतेची सेवा करत राहिल. संयम ठेवावा व मला फोन करू नये. माझं जीवन बिहारच्या जनतेला समर्पित आहे,” असं ते म्हणाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”