पुणे । “बिहारमध्ये तरुण नेतृत्व उदयाला येत आहे. पण तिथे अपेक्षेनुसार निकाल लागले नाहीत. बिहारमध्ये भाजप विरुद्ध तेजस्वी यादव अशीच निवडणूक पाहायला मिळाली. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान, केंद्रातील अनेक मंत्री, स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाची ताकद होती, अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
याशिवाय ‘बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी खूप मेहनत घेतली. बिहारमध्ये NDAला बहुमत मिळण्याचा अंदाज असला तरी तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे’, अशा शब्दात तेजस्वी यादव यांचं पवारांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. या निवडणुकीत जरी बिहारमध्ये बदल झाला नसला, तरी भविष्यात तिथे बदलाची वाट मोकळी झाल्याचं पवार म्हणाले. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना जेवढी मोकळीक मिळेल तेवढा फायदा त्यांना होईल, असा अंदाज होता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस बिहारच्या निवडणुकीत सहभागी झाली नव्हती, अशी माहिती पवारांनी दिली आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांना मोठा फटका बसला असं म्हणता येणार नाही. भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी नितीश कुमार यांचं फार नुकसान झालं असं म्हणता येणार नसल्याचंही पवार म्हणाले. त्याचबरोबर गेली 15 वर्षे नितीश कुमार सत्तेवर असले तरी पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या जंगलराज या टीकेचा परिणामही बिहारच्या लोकांच्या मनावर झाल्याचं पवार म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in