हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दारूबंदी असलेल्या बिहार राज्यात नारळाच्या पाण्याऐवजी दारूची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दारूबंदी असणाऱ्या राज्यात अशा अनोख्या शक्कल लढवल्या जातात. नारळाच्या शहाळ्याची नारळ पाणी म्हणून विक्री केली जाते. मात्र बिहारमध्ये अवैध दारूची विक्री करण्यासाठी शहाळ्यात नारळ पाण्याची ऐवजी दारू विकली जात आहे. नवादा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील प्रजातंत्र चौकात एक नारळ पाणी विक्री करणारा विक्रेता असतो. पण तो नारळ पाणीच्या ऐवजी नारळात दारु ठेवून अवैधरित्या दारुविक्री करतो. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी (4 फेब्रुवारी) बिहार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी त्या नारळपाणी विक्रेत्याच्या दुकानातून 200 मिलीलीटरचे 16 पॅकेट आणि देशी दारुच्या सात बॉटल्स जप्त केल्या आहेत.




