हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाने (coronavirus)संपूर्ण जगावर थैमान घातल्यानंतर आता स्थिती थोडी सुधारताना दिसत असली, तरी बिल गेट्स (Bill Gates) यांनी पुन्हा एक महत्त्वाची चेतावणी दिली आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक गेट्स यांच्यानुसार, भविष्यात कोविडसारखी आणखी एक महामारी येण्याची 10 ते 15 टक्के शक्यता आहे, आणि पुढील 4 वर्षांमध्ये ही परिस्थिती ओढावणार असल्याचे सांगितले आहे. तर चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेली मुलाखत –
वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांनी याबाबत विचार व्यक्त केले. त्यांनी म्हटलं की, भूतकाळात ज्या प्रकारच्या चुका झाल्या त्यापेक्षा भविष्यातील संकटासाठी आपण तयार असणे महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे प्राण गेले असले तरी, समोर येणाऱ्या संभाव्य संकटाला आपली तयारी अजिबात नाही. आपल्याकडून आवश्यक ती तयारी केली जात नाही, आणि आधी केलेल्या चुका दुसऱ्यांदा होण्याची शक्यता आहे, असं गेट्स यांचे म्हणणे आहे.
कोविड-19 च्या फैलावाचे गेट्स यांचे संकेत –
गेट्स यांनी 2015 मध्ये टेड टॉक्स कार्यक्रमातही ही चिंता व्यक्त केली होती की, जग एका महामारीसाठी तयार नाही. त्यानंतर 2019 मध्ये कोविड-19 (coronavirus) च्या फैलावामुळे त्यांनी दिलेले संकेत सत्य ठरले. त्यानंतर, 2022 मध्येही जागतिक आरोग्य यंत्रणेत क्रांतिकारी बदलांची आवश्यकता असल्याचे गेट्स यांनी सांगितले होते.
गेट्स यांचा इशारा –
गेट्स यांचा इशारा आहे की, एकंदरीत जगाने आणखी एका महामारीसाठी सज्ज होण्यासाठी त्वरित उपाययोजना करायला हव्यात. आरोग्य यंत्रणा आणि सरकारने त्यासाठी तयारी सुरू केली पाहिजे, नाहीतर भविष्यात पुन्हा एकदा जागतिक संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.