औरंगाबाद – शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी दिल्या, त्यांना भरपाईपोटी मोठी रक्कम मिळाली. मात्र पैठण तालुक्यात अशा शेकडो सधन शेतकऱ्यांना गाठून युवकाने भरगोस व्याजाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून कोट्यवमधी रुपये घेतले. 30-30 नावाच्या या योजने गुंतवणूक केल्यावर काही गुंतवणूकदारांना सुरुवातीला नियमित परतावा मिळाला, मात्र नंतर या कंपनीने परतावा देण्यास टाळाटाळ केली. बिडकीन परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी यात कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. सोमवारी बिडकीन पोलिसात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी योजनेचा मास्टरमाइंड संतोष ऊर्फ सुनील राठोड आणि पैसे जमा करणारा मध्यस्थ विजय रामभाऊ ढोबळे या दोघांवर गुन्हा दाखल केला.
गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष राठोड हा एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मुलगा असून मूळ कन्नडमधील रहिवासी आहे. सध्या तो कुटुंबासह औरंगाबादमध्ये बीड बायपास भागात रहात होता. आलिशान गाड्या, बड्या मित्रांच्या गराड्यात तो नेहमी असे. आपण नेहमीच बड्या कंपन्यांशी करार करून त्यांच्यासोबत काम करतो, असे तो लोकांना भासवत असते. या राहणीमानालाच अनेक शेतकरी भूलले आणि संतोष राठोड याच्या 30-30 योजनेत पैसे गुंतवू लागले. 2005 पासून तो शेतकऱ्यांकडून पैसे घेत होता. या रकमेवर 35 टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचे अमिष त्याने शेतकऱ्यांना दाखवले.
सन 2014-15 मध्ये बिडकीन परिसरात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी भूसंपादन झाले. यात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोठा मावेजा मिळाला. त्यानंतर एवढा पैसा कशा प्रकारे गुंतवायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. हीच स्थिती हेरून 30-30 योजनेची भुरळ घातली गेली. वास्तविक पाहता या ग्रुपची कुठेही नोंद नाही. ग्रुपशी निडगीत मध्यस्थ आणि राठोड यांच्या गाड्यांचे नंबर 30-30 आहेत. त्यावरून ग्रुपची ओळखच ती बनली. तसेच शेतकऱ्यांनी सर्व पैसे रोखीने दिले आहेत. त्यामुळे तक्रार कशी करायची, या विचारात गुंतवणूक दार आहेत. सोमवारी दाखल झालेल्या गुन्ह्यातील फिर्यादीने मध्यस्थ असलेल्या चुलत भावाच्या खात्यावर पैसे वर्ग केल्याने हा एकमेव तांत्रिक पुरवा समोर आला आहे. आता पोलिस मास्टरमाइंडपर्यंत कसे पोहोचतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.