नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | काश्मिरमध्ये १० – १२ वर्षांची मुले देखील कट्टरपंथीयांना बळी पडली आहेत. आणि या वयोगटातील मुलांना कंट्टरपंथीयांपासून रोखण्यासाठी आपण डिरेडिकलाईझेशन कॅम्प चालवत असल्याची माहिती भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांनी गुरुवारी दिली. दिल्ली येथे आयोजित ‘रायसीना संवाद’ या कार्यक्रमात बोलताना रावत यांनी यावर भाष्य केले.
काश्मीरमध्ये १०-१२ वर्षाची मुले आणि मुली कट्टरपंथीयांना बळी पडली आहेत आणि या मुलांना कट्टरपंथीयांपासून वाचवण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या छावण्यांमध्ये आणावे लागणे चिंताजनक आहे असं मत रावत यांनी यावेळी व्यक्त केले.
भारत सरकार कट्टरपंथीयतेपासून मुक्तीसाठी देशात शिबिरे घेत असल्याचा खुलासा बिपिन रावत यांनी पहिल्यांदाच केला आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा संदर्भ देताना रावत म्हणाले की, घाटीमध्ये 10 आणि 12 वर्षांच्या मुला-मुलींचे कट्टरपंथीकरण केले जात आहे, ही चिंताजनक बाब आहे. बिपिन रावत म्हणाले, “या लोकांना हळूहळू कट्टरतावादापासून वेगळे केले जाऊ शकते. तथापि, असेही काही आहेत जे पूर्णपणे कट्टरपंथी बनले आहेत. कट्टरपंथीयतेपासून मुक्त होण्यासाठी या लोकांना वेगळ्या छावण्यांमध्ये नेण्याची गरज आहे. पाकिस्तानातही कट्टरतावादापासून मुक्त होण्यासाठी छावण्या आहेत. पाकिस्तानमध्येही अतिरेकीपणापासून मुक्तीसाठी शिबिरे चालविली जात आहेत कारण त्यांना हे समजले आहे की ते पुरस्कृत करत असलेल्या दहशतवादाचा त्यांच्यावरही वाईट परिणाम होत आहे.
दरम्यान अशा प्रकारे काश्मिरी तरुणांना छावण्यांमध्ये ठेवणे कितपत योग्य हा चर्चेचा विषय आहे. कोण कट्टरपंथी आणि कोण नाही हे कसे ठरवले जाणार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तसेच काश्मिर खोर्यातील अशांतता यामुळे कमी होणार का हा वादाचा मुद्दा आहे.