हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा कहर आटोक्यात आला असतानाच आता बर्ड फ्लू मुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. देशातील 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा पैलाव आढळून आल्यानंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील मृत्यु पावलेल्या त्या 800 कोंबड्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर येत आहे. येथील जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे मुरुंबा गाव संसर्गित झाल्याचे जाहीर करून बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई उद्यापासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, परभणीमधील मुरुंबा गावात बर्ड फ्लूच्या केसेस आढल्यामुळे येथील प्रशासन सतर्क झाले आहे. मुरुंबा गावातील 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या भागात कुक्कुटपालकांची संख्या मोठी आहे. मुरुंबा, असोला या भागात 10 हजारपेक्षा अधिक कोंबड्या आहेत. या कोंबड्याच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीवर दहा किलोमीटर परिसरात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
मुरुंबा गावातली सर्व पक्षी नष्ट करण्यात येत असले तरी संपूर्ण परभणी जिल्ह्यात अलर्ट घोषित करण्यात आलाय. जिल्हाप्रशासन परभणी जिल्ह्यात पक्ष्यांचा सर्वे करणार आहे. इतर कुठे बर्ड फ्ल्यूचा प्रसार झालाय का याची माहितीसुद्धा प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’