हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिरूर (Shirur) तालुक्यातील बावी गावात हरिण शिकारीप्रकरणी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त कारवाईत खोक्या उर्फ सतीश भोसले (Satish Bhosale) याच्या घराची झडती घेतली असता, तिथे जनावरांचे सुकलेले मांस आणि शिकारीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. मात्र, या कारवाईपूर्वीच खोक्या फरार झाला आहे, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार समोर आल्यानंतर त्याला थेट बिश्नोईकडून (Bishnoi) धमकी देण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी
एका अज्ञात व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी “लॉरेन्स बिश्नोई” या नावाने एक फेसबुक अकाउंट तयार करून त्यावरून खोक्याला धमकी दिली आहे. या पोस्टमध्ये, “हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्याला कोणतीही माफी मिळू नये आणि त्याला तातडीने अटक झाली पाहिजे” असे म्हटले आहे. ही धमकी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामुळे परिसरात अधिक तणाव निर्माण झाला आहे.
ढाकणे कुटुंबावर अमानुष हल्ला
ही घटना काही दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील बावी गावात घडली. खोक्या उर्फ सतीश भोसले याने आपल्या शेतात हरिण पकडण्यासाठी गुप्तपणे जाळे लावले होते. मात्र, हे लक्षात आल्यानंतर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांनी त्याला विरोध केला. याच कारणावरून खोक्याने ढाकणे पितापुत्राला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महेश ढाकणे यांचे पुढील दात तुटले, तर दिलीप ढाकणे यांच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर शिरूर तालुका संतप्त झाला आहे. ग्रामस्थांनी पोलिसांवर खोक्याला पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे. “इतका गंभीर गुन्हा करूनही तो अजूनही मोकाट फिरतोय, पोलिसांनी त्याला अटक का केली नाही?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे, तसेच, मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरून निषेध या घटनेचा निषेध नोंदवत आहेत.