हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपचे ४०० पारचा नारा दिला होता, आपण ४०० जागा आरामात जिंकू असा दावा अजूनही भाजपचे नेते मोठ्या विश्वासाने देत असतात. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ४०० पारचा नारा बकवास आहे, त्याउलट भाजपच्या २०० जागाही येत नाहीत असं खर्गे यांनी म्हंटल आहे. अमृतसरमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या जागा कशा कमी होतील ते सुद्धा सांगितलं.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, भाजपच्या कमी होतील तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या जागा वाढताना आपल्याला दिसतील. त्यामुळे 400 पारचा नारा हा मूर्खपणा आहे. भाजपवाले सरकारही बनवू शकत नाहीत आणि 200 जागांच्या पुढे जाऊ शकणार नाहीत. तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्ये भाजपचे अस्तित्व नाही आणि कर्नाटकात सुद्धा भाजप मजबूत परिस्थितीत नाहीत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये टक्कर पाहायला मिळेल तर महाराष्ट्रात भाजप कमकुवत आहे. मग अशा परिस्थितीत तुम्हाला 400 जागा कशा मिळतील असा उलट सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
दरम्यान, लोकसभा निडवणुकीत पराभव झाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे याना आपली नोकरी गमवावी लागेल असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला होता, त्यावरही खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. लहानपणापासून लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. इथे आता मला तेवढीच वर्षे झाली आहेत, जेवढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय आहे. ४ जूननंतर त्यांनी स्वत:च्या कामाचा विचार केला पाहिजे, असा पलटवार खरगे यांनी केला. केंद्र सरकारमध्ये 30 लाख पदे रिक्त आहेत, जर देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर ही सर्व पदे भरली जातील असे आश्वासन खर्गे यांनी दिले.