सातारा | भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विक्रम पावसकर यांनी कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे दुर्गा माता दौड दरम्यान मुस्लिम बांधवांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण केले. हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात रमेश उबाळे यांनी म्हटले आहे, विक्रम विनायक पावसकर हे दुर्गा माता दौड संपन्न करण्यासाठी वाठार येथे आले होते. त्यांनी यावेळी येथे मार्गदर्शन करताना सामाजिक भान विसरून हिंदू मुस्लिम जातीय तेढ निर्माण व्हावी, या हेतूने वारंवार मुस्लिम बांधवांविषयी व मुस्लिम धर्माविषयी अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावले आहेत. त्यांनी आपल्या भाषणातून सामाजिक सलोखा बिघडवण्याची काम केले आहे. पावसकर यांनी एकेरी मत मांडून मुस्लिम बांधवांची बदनामी केल्याचे दिसते. त्यांचे केलेले भाषण पाहता समाजातून मुस्लिम समाजाला वेगळे करण्याचा उद्देश दिसून येत आहे.
मराठा- मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा त्यांच्या भाषणातून स्पष्ट दिसत आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे ते समाज प्रबोधनाच्या नावाखाली काम करत आहेत. विक्रम पावसकर यांची ताबडतोब पोलीस चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही दलित बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मुस्लिम समाजाला न्याय देण्याची कार्यवाही आपल्या कार्यालयातून व्हावी ,अशी आमची अपेक्षा आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, मुस्लिम समाजाने रमेश उबाळे यांना लेखी निवेदन दिले असून विक्रम पावसकर हे कायद्याचे भान व भीती नसल्यासारखे वागत आहेत. हिंदू- मुस्लिम समाजामध्ये एकीचे वातावरण असताना आपले एकेरी मत मांडून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा पावसकर यांचा हेतू आहे. आपण याबाबत एक पाऊल पुढे चालून मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा. याबाबत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करावी. यावर मूस्लिम समाजाच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवणार असल्याची ग्वाही उबाळे यांनी मुस्लिम बांधवाना दिली.