हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारला शह देण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच राज ठाकरे हे आमच्यापासून दूर गेलेलं नाहीत असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याना विचारले असता त्यांनी देखील सूचक वक्तव्य केले.
फडणवीस म्हणाले, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल. मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. तसेच चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यास त्यांच्यात युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे