भाजपची सातवी यादी जाहीर; नवनीत राणांना तिकीट, साताऱ्याचा सस्पेन्स कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजपकडून उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार यंदा भाजपने अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा (Navneet Rana) यांना तिकिट दिले आहे. तसेच, चित्रदुर्ग येथून गोविंद करजोल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याला नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही” अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.

आज भाजपकडून अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर राजकिय वर्तुळात वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी ही “काहीही करा पण अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका”, असे साकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले होते. मंगळवारी अमरावतीतील भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमधील बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी त्यांनी, नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी केली. परंतु तरी देखील आज भाजपकडून नवनीत राणा यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, आज भाजपची सातवी यादी जाहीर झाली असली तरी यात साताऱ्याच्या जागेबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. कारण, उदयनराजे भोसले यांनी दिमाखात साताऱ्यात स्वागत करण्यात आला असलं तरी आजच्या भाजपच्या यादीत राजेंच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघात भाजपकडून कोणाला संधी मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.