हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दिल्ली हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप कमी पडत आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये समन्वयचा अभाव आहे. महाविकास आघाडी सरकारला घेरण्यात भाजप कमी पडत आहे. नवाब मलिक प्रकरणात पक्ष कमी पडला. केवळ कोल्हापूर, पुण्यात फिरू नका, राज्यभर दौरे करा. नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधा, अशा सूचना नेतृत्त्वाकडून पाटील यांना करण्यात आल्या.
राज्यातील महा विकास आघाडी विरोधात रान उठवण्यात अपयश आल्याचेही भाजपच्या हायकमांडने निदर्शनास आणून दिले. येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही भाजपा हायकमांडने दिल्या आहेत