औरंगाबाद : 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू केल्यानंतर नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र शहरातील लसीकरणाचा साठा संपल्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात लसीकरण केंद्रात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. काल लसीकरण केंद्रावर नागरिकांची चेंगराचेंगरी झालेले दृश्य पाहायला मिळाले. आज वाळूज येथील बजाज नगर लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुंबळ गर्दी झालेली पाहायला मिळाले. यामुळे बराच गोंधळ देखील उडाला.
200 लसींचा साठा उपलब्ध असताना शेकडो नागरिक रांगेत थांबलेले होते. यापैकी 100 लसीकरणासाठी टोकण कालच वाटण्यात आले होते. तरीदेखील पहाटे तीन वाजल्यापासून नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. रांगेत उभे राहिल्यामुळे अनेकांना त्या ठिकाणी चकरा देखील आल्या. 200 नागरिकांना लसीकरण करण्यात आले बाकीच्यांना घरी परतावे लागले यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कामगारांच्या लसीकरणासाठी किती निष्काळजीपणा केला जातो हे समोर येत आहे.
बजाजनगर हे मोठे औद्योगिक क्षेत्र आहे याठिकाणी कामगार देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कंपनीमध्ये काम करणार्या प्रत्येक वर्करला लसीकरण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सकाळी पाच वाजेपासून लसीकरण केंद्रावर ती लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली लक्षात घेताच स्थानिक पोलिस स्टेशनचे पदाधिकारी व पोलीस कर्मचारी लसीकरण केंद्रावर मोठया प्रमाणात तैनात झाले. तेथील गर्दी पाहता स्थानिक नेत्यांनी देखील तेथे उपस्थिती लावली. तेथील कामगारांची हेळसांड पाहून भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत महविकास आघाडीवर कडाडून टिका केली. कामगारांच्या लसीकरणाचा प्रश्न सुटला नाही, त्यांची हेळसांड याच प्रकारे चालू राहिली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.