हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदा विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपाने महायुतीसोबत लढत तब्बल १३२ जागांवर विजय मिळवला. हाच निकाल पक्षासाठी ऐतिहासिक ठरला आहे. ज्यामुळे भाजपाच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र आता आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवावी, असा सूर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लावला आहे. अलीकडेच झालेल्या कोअर कमिटी बैठकीत काही भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Government Elections) भाजपने स्वातंत्र्य लढाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या या भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही संमती मिळाली आहे. यामुळे भाजपाच्या रणनीतीबाबत महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता 22 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी फडणवीस आणि शाह यांच्यात या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी, महापालिकेच्या निवडणुका स्वातंत्र्य लढाईच्या की एकत्र याबाबत निर्णय होऊ शकतो.
महायुतीमध्ये मतभेद?
सध्या भाजपाच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्यास जास्त फायदा होईल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. तसेच, भाजपा स्वबळावर लढल्यास महायुतीतील प्रत्येक पक्षाला तोटा होऊ शकतो, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. अशातच आता भाजपाने स्वबळाचा नारा दिल्यामुळे महायुतीतील मध्ये भेद वाढू शकतात, असे म्हणले जात आहे.
या सर्व राजकीय घडामोडीमुळे चर्चांना उधाण आले आहे. तर “भाजपा स्वबळावर लढण्याचा विचार करत असला, तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही महायुती म्हणून एकत्र लढलो तरच मतदारांचा पाठिंबा राहील,” असे वक्तव्यं मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. तसेच, स्थानिक पातळीवर भाजपाच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी म्हणले आहे.




