नागपूर । माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन वीजबिल माफीच्या मुद्द्यावरू राज्य सरकारवर सडकून टीका केली. वीजबिल माफीसाठी ५ हजार कोटी रुपये लागतील. पण सरकार पैसे देण्यास तयार नाही. अनिल परब यांच्या परिवहन खात्याला कामगारांच्या पगारासाठी एक हजार कोटींची गरज होती. त्यांना तात्काळ पैसे देण्यात आले. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवालच बावनकुळे यांनी केला.
वीज बिलाच्या मुद्द्यावर हे सरकार खोटं बोलत आहे. सरकारने १०० युनिट वीज माफीचं आश्वासन दिलं होतं. दिलेलं आश्वासन या सरकारने पाळलं नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. तरीही सरासरी बिल दिलं. ऊर्जामंत्री नितीन राऊतही हतबल आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या फायली फेकून देत आहेत. सामाजिक चळवळीतून आलेल्या राऊत यांचं नाव खराब करण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारमध्ये वाद आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. (chandrashekhar bawankule on electricity bill issue)
खुशाल चौकशी करा
या सरकारच्या काळात अनेक अवैध धंदे वाढले आहेत. रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी वाढली आहे. नागपूर, भंडारा आणि यवतमाळवरून रेट ठरवून दारूची तस्करी वाढली आहे. सरकारच्या काळातील या धंद्यावर प्रकाश टाकला तर बिघडले कुठे?, असं सांगतानाच सरकार तुमचंच आहे. माझी खुशाल चौकशी करा, असं आव्हानच बावनकुळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं नाव न घेता दिलं.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in