‘एकत्र असण्यात काही वावगं नाही, पण याचा अर्थ मागचं सारं काही मिटलं असं नाही’- पंकजा मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । भाजपच्या नेत्या मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पुण्यात एकत्र आले असताना त्यांनी धनंजय मुंडेंना सूचक इशारा दिला. जनतेच्या प्रश्नावर एकत्र असण्यात काही वावगं नाही. मात्र, याचा अर्थ मागचं सगळं मिटलं असाही नाही, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी धनंजय मुंडे यांना पंकजा यांच्याशी संवाद साधला का, अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा धनंजय मुंडे यांनी, ‘एखाद्या प्रश्नावर प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असेल तर संवाद झाला तर काय वाईट आहे’, असे उत्तर दिले. त्यावर पंकजा मुंडे यांनीही जनतेच्या प्रश्नावर एकत्र येण्यात काही वावगे नसल्याचे सांगितले. परंतु, याचा अर्थ मागचं सगळं मिटल असाही नाही, असेही सांगायला पंकजा मुंडे विसरल्या नाहीत.

धनंजय मुंडे यांनी सोमवारी बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना टोला लगावला होता. काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठीच जिल्ह्यात येतात. एरवी जिल्ह्यातील लोकांकडे बघायला त्यांना वेळ नसतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. पंकजा मुंडे यांनी आज (27 ऑक्टोबर) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं. एखादी पराभूत व्यक्ती नांदेडपासून 8 जिल्ह्यांमध्ये स्वागत सत्कार घेतल्यानंतर मोठा मेळावा घेत असेल, तर ही पुण्याईच म्हणावी लागेल. अशाप्रकारे पराभव साजरा करायचं नशीब कुणाला लाभतं, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

पराभव साजरा करायलाही नशीब लागते
“काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी जिल्ह्यात येतात, या धनंजय मुंडे यांच्या खोचक टीकेला मंगळवारी पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं. पराभव साजरा करण्यात काय गैर आहे? मी पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला. इतके दिवस मी घरात राहिले तर घरात का बसलात, असा प्रश्न विचारला जायचा आणि आता बाहेर पडले तर पराभव साजरा करायला बाहेर आल्या, अशी टीका माझ्यावर होते. परंतु, पराभव साजरा करायलाही नशीब लागते,” अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.(BJP leader Pankaja Munde comment on meeting with Dhananjay Munde ).

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in