औरंगाबाद । ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी जालना येथे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या निमित्तानं ‘ओबीसी मुख्यमंत्री’ (OBC CM) या नव्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. जालन्यातील ओबीसी मोर्चात ‘ओबीसी मुख्यमंत्री व्हावा’ असे बॅनर झळकवण्यात आले होते. तशा घोषणाही दिल्या जात होत्या. यानंतर ‘ओबीसी मुख्यमंत्री’च्या मागणीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मला यापासून थोडं मुक्त ठेवा. ही चळवळ कुठल्याही पदावर नसताना मला पुढं न्यायची आहे. माझं ते महत्त्वाचं ध्ये आहे. मुंडे साहेबांचं ते एक अपूर्ण ध्येय आहे, ते मला पूर्ण करायचं आहे,’ असं पंकजा यांनी सांगितलं. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी जालना येथे काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यातील अनेक ओबीसी नेते सहभागी झाले होते. मात्र, पंकजा मुंडे मोर्चाला अनुपस्थित होत्या. त्याबद्दल आज त्यांना विचारलं असता, ‘कार्यक्रमात असणं हेच महत्त्वाचं नाही. त्या चळवळीचा भाग आम्ही अनेक वर्षे आहोत,’ असं पंकजा म्हणाल्या. (Pankaja Munde on OBC CM)
‘ओबीसी जनगणना व्हावी ही आमची जुनी मागणी आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी ही भूमिका वेळोवेळी मांडली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनीही याबाबत संसदेत आवाज उठवला आहे. आता नव्यानं जनगणना होणार आहे. त्यावेळी त्याबाबत सकारात्मक पावलं उचलली गेली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाल्यास सर्व गोष्टी रडारवर येतील. त्यामुळं संबंधित समूहांना न्याय देण्यास मदत होईल,’ असंही त्यांनी सांगितलं.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’