हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. पोलिसांचा दुरुपयोग करुन महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी लावल्याचा आरोप यावेळी भाजपने केला. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची कॉंग्रेस वर टीका केली आहे. काँग्रेसच्या रक्तामध्येच आणीबाणी भिनलेली आहे. अर्णब गोस्वामी यांना सरकारने अटक करून आणीबाणीसारखीच परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
गोस्वामी यांना अटक केल्याने भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी अलिबागकडे धाव घेतली. दुपारी अडीच वाजता अलिबाग येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयातून मोर्चा काढण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते झेंडे घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. अन्वय नाईक यांच्या प्रकरणाआडून सरकार गोस्वामी यांच्यावर कारवाई करत आहे, याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
सरकार आपले अपयश लपवण्यासाठी अशी सुडात्मक कारवाई करत आहे. महत्त्वाच्या घटनांकडून लक्ष दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने अलिबागमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अरुणकुमार वैद्य हायस्कूल येथे अडवले. या प्रसंगी भाजप नेते किरीट सोमय्या, प्रवक्ते आमदार राहुल नार्वेकर, आमदार रवींंद्र पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते युवा अध्यक्ष विक्रांत पाटील सहभागी होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’