नवी दिल्ली । भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी पुन्हा एकदा स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. कोरोना संकटात NEET आणि JEE परीक्षा घेण्यावरुन सध्या केंद्र सरकार आणि बिगरभाजप राज्यं आमने सामने आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यात असमर्थ असल्यास सर्व मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे त्यावर भाष्य करावं तसंच परीक्षा घेणार नाही असं पंतप्रधानांना सांगावं असं आवाहन सुब्रहमण्यम स्वामी यांनी केलं आहे.
सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पोहोचवण्याची आणि नंतर तेथून पुन्हा घरी पोहोचण्याची हमी मुख्यमंत्री देऊ शकतात का ? जर नाही तर मग त्यांना ते सार्वजनिकपणे बोलावं, तसंच परीक्षा घेणार नाही असं पंतप्रधानांकडे जाहीर करावं”.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने १७ ऑगस्ट रोजी NEET UG 2020 आणि JEE (main) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगर भाजप ६ राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्यासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. JEE (main) परीक्षा १-६ सप्टेंबर तर NEET UG 2020ची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.