हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा (BJP Manifesto 2024) प्रसिद्ध केला आहे. मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भाजपने आपला जाहीरनामा सर्वांसमोर आणला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे दिग्ग्ज नेते उपस्थित होते. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला आहे. भाजपचा जाहीरनामा युवा, नारीशक्ती, गरीब आणि शेतकऱ्यांवर आधारित आहे. भारतीयांचे जीवन उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे असं मोदींनी म्हंटल.
भाजपच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने – BJP Manifesto 2024
गरिबांच्या जेवणाची थाळी पोषणयुक्त असावी, त्यामुळे पुढील ५ वर्ष गरिबांना मोफत रेशन देण्यात येणार आहे.
७० वर्षांवरील सर्व वृद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आणि ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार
तृतीयपंथीयांना सुद्धा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार
गरिबांसाठी आणखी ३ कोटी नवीन घरे उभारणार
घराघरात पाईपलाईनने गॅस पोचवणार
कोट्यवधी लोकांचे वीजबिल शून्यावर आणणार
लोकांना कमी पैशात औषधें उपलब्ध करून देणार
मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसायासाठीच्या कर्जाची मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत करणार
३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवणार
इको टुरिजम साठी नवीन केंद्रे सुरु करण्यावर भर देणार
महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार
डिजिटल क्षेत्राच्या विकासासाठी ५ G हा विस्तार करणार
वंदे भारत स्लीपर, वंदे भारत मेट्रो आणि वंदे भारत साधारण ट्रेनची संख्या वाढवणार
देशाच्या चारही कोपऱ्यात प्रत्येकी एक बुलेट ट्रेन सुरु करणार
ट्रक चालकांसाठी महामार्गाच्या शेजारी पायाभूत सुविधा उभारणार