नवी दिल्ली | भाजप आमदार बलराम थवानी यांनी रहिवाशांच्या हक्कासाठी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या एका महिलेला जमिनीवर पडेस्तोवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार नरोदातील कुबेरनगरमध्ये उघडकीस आला आहे. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असं महिलेचं नाव असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुख आहेत.
नीतू तेजवानी या काही दिवसांपूर्वी थवानींच्या कुबेरनगरमधील कार्यालयात गेल्या होत्या. विभागातील घरे आणि कार्यालयांतील कापलेल्या नळजोडण्या दोन दिवसांत पुन्हा दिल्या नाहीत तर, कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा त्यांनी थवानींना दिला. त्यानंतर थवानींचा भाऊ स्थानिक नगरसेवक किशोर हे गेल्या आठवड्यात माया सिनेमाजवळ गेले आणि त्यांनी पाहणी केली. त्याचवेळी तिथे वाद झाला. किशोर यांनी व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोपही झाला होता.
कुणालाही मारहाण करण्याचा माझा हेतू नव्हता. जमावाकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. स्वसंरक्षणासाठी मारलेली लाथ चुकून महिलेला लागली, असं स्पष्टीकरण बलराम थवानी यांनी दिलं. नारिंगी रंगाचा कुर्ता घातलेले बलराम महिलेला लाथा मारत असल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या बाजूला सफेद कुर्त्यात असलेली व्यक्ती त्या महिलेच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. तसंच नीतू तेजवानी यांचे पती राजेश यांनाही थवानींच्या समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे. ‘थवानींना भेटण्यासाठी रविवारी त्यांच्या कार्यालयात गेले. कार्यालयासमोरच धरणे धरण्याचा निर्णय घेतला. नळजोडण्या देण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत दिली. पण थवानी आणि त्यांच्या समर्थकांनी आम्हाला तेथून जबरदस्तीनं हटवण्यास सुरुवात केली. आम्हाला मारहाण केली. काही जण हॉकी स्टिक घेऊन आले. आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली,’ असं नीतू तेजवानी यांनी सांगितलं. ‘आम्ही वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडिओ पाहिला आणि आता आमच्याकडे या प्रकरणी तक्रारही आली आहे,’ अशी माहिती झोन ४चे पोलीस उपायुक्त नीरज बडगुजर यांनी दिली.