भाजपला अजित पवार नकोसे? आमदारांमध्ये खदखद; महायुतीत मोठं काहीतरी घडणार??

Ajit Pawar BJP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीला आता अजित पवार (Ajit Pawar) नकोसे झाले आहेत अशा चर्चा आहेत. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजप आमदारांचे मत असून आता अजित पवारांना सोबत ठेवावं कि नको याबाबत फेरविचार करण्याची मागणी भाजपच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे लोकसभेतील पराभवाचे खापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वी अजित पवार गटावर फोडलं होते. आता भाजप आमदारांनी सुद्धा दादा गटबाबत नाराजी दर्शवल्याने महायुतीत पुढे काय होणार ते आता बघावं लागणार आहे.

अजित पवार गटाची मते भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे ट्रान्सफर न झाल्याचा भाजप आमदारांचा दावा आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघांची यादीच समोर केली आहे. खास करून सोलापूर, माढा, मावळ, दिंडोरी, शिरूर इत्यादी मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाची ताकद असूनही महायुतीच्या उमेदवाराला अपेक्षित मतदान झालं नाही. इतर मतदारसंघातही अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि नेते सक्रिय नसल्याचा दावा भाजप आमदारांकडून करण्यात येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड विधानसभा मतदार संघात दिलीप मोहिते पाटील, जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप ळळसे पाटील आणि हडपसर येथे चेतन तुपे हे चारही आमदार दादा गटाचे असताना सुद्धा त्याठिकाणी आढळराव पाटील पराभूत झाल्याचे मत भाजप आमदारांनी व्यक्त केले आहे.

यापूर्वी संघाने उपटले कान-

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ऑर्गनायझर साप्ताहिकात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपच्या पराभवावरून अजित पवार गटावर खापर फोडण्यात आलं होते. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली, अशी टीका ऑर्गनायझर मधून करण्यात आली होती. यानंतर दादा गटाने या टीकेला प्रत्युत्तर सुद्धा दिले. मात्र आता खुद्द भाजप आमदारांमध्येच नाराजी असल्याने आगामी काळात महायुतीत काय काय घडामोडी घडतात ते पाहायला हवं .