मुंबई प्रतिनिधी । भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. लोढा व त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ३१,९६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यंदाच्या चालू वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे.
हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडियाने सोमवारी ‘ग्रोही हुरुन इंडिया रीयल एस्टेट रिच लिस्ट २०१९” जारी केली. त्यांच्याकडून केले गेलेल्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. या सूचीमध्ये डीएलएफचे राजीव सिंग आणि एम्बॅसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवाणी हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील १०० मोठ्या व्यावसायिकांचं एकूण उत्पन्न २ लाख ७७ हजार कोटी रूपये इतकं आहे. या वर्षी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या ६ कंपन्यांनी २ हजार कोटी रूपयांची तर अन्य २० कंपन्यांची १ हजार कोटी रूपयांची विक्री केली. तर लोढा कुटुंबीयांचे ३१ मार्चपर्यंत एकूण ४० प्रकल्प सुरू होते. मंगलप्रभात लोढा हे भाजपाचे मुंबई अध्यक्षदेखील आहेत.
गेल्या वर्षभरात लोढा कुटुंबीयांच्या एकूण उत्पन्नात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर राजीव सिंग याच्या एकूण उत्पन्नात गेल्या वर्षभरात तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच या यादीतील १०० पैकी ३७ बिल्डर मुंबईत राहत आहेत. दिल्ली आणि बंगळूरमध्ये यादीतील प्रत्येकी १९ बांधकाम व्यावसायिक राहतात.