हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्षा असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे पीएफचे १ कोटी ४६ लाख रुपये थकवल्याप्रकरणी कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. कारखान्याच्या बँक खात्यावर कारवाई करून ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पंकजा मुंडेंना धक्का दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते आहे. या खात्यावर औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची १.४६ कोटी रुपयांची थकीत रक्कम होती. त्या रक्कमेत ५६ लाख रुपयांच्या वसुलीचे काम सध्या सुरु आहे. तर ९२ लाख रुपयांची थकबाकीची वसुली आतापर्यंत करण्यात आलेली आहे.
आता कारखान्याच्या बँक खात्यावर कारवाई केल्यानंतर सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे.