हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकीय वर्तुळात आज दोन दुःखद घटना घडल्या आहेत. एकीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे निधन झाले आहे. तर दुसरीकडे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patni) यांचेही दीर्घ आजारामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. राजेंद्र पाटणी यांनी वयाच्या 59 वर्षी मुंबईमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. आज राजेंद्र पाटणी आणि मनोहर जोशी यांच्या निधनाच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
राजेंद्र पाटणी हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पाटणी यांच्या निधनानंतर भाजपाच्या इतर नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या X अकाउंटवर पोस्ट लिहीत म्हटले आहे की, “विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”
दरम्यान, राजेंद्र पाटणी सर्वात पहिल्यांदा 1997 साली विधान परिषदेवर निवडून आले होते. यानंतर 2004 त्यांनी कारंजा मतदारसंघातून विजय मिळवला. पुढे 2014 आणि 2019 मध्ये देखील त्यांनी कारंजा मतदारसंघातूनच निवडणूक जिंकली. मात्र मागच्या गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे.