‘त्या’ भाजप आयटी सेल प्रमुखाला उद्यापर्यंत हटवा अन्यथा.. सुब्रह्मण्यम स्वामींचे चक्क पक्षाला अल्टिमेटम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेते तथा राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आता चक्क पक्षाला अल्टिमेटम दिलाय. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाच्या आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्याविरुद्ध जाहीर मोर्चा उघडलाय. बुधवारी पुन्हा एकदा सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अमित मालवीय यांच्याविरुद्ध ट्विट करत पक्षाकडे मालवीय यांना पदावरून हटवण्याची मागणी केलीय.

‘उद्यापर्यंत अमित मालवीय यांना भाजप आयटी सेलमधून हटवण्यात आलं नाही, तर याचा स्पष्ट अर्थ आहे की पक्षाला मला वाचवायचं नाही. अशा वेळी पक्षात अशी कोणतीही व्यवस्था नाही जिथे मी माझं म्हणणं मांडू शकेल, तर मला स्वत:ला वाचवायला हवं’ असं ट्विट सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलंय. याबाबत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना आपण अगोदरच आपल्या तडजोडीच्या पाच मागण्यांबद्दल कळवल्याचंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय.

स्वामी यांनी सोमवारीही अमित मालवीय यांच्याविरुद्ध उघडपणे सोशल मीडियावर टीका केली होती. ‘भाजपच्या आयटी सेलनं ताळतंत्र सोडलंय. आयटी सेलचे काही सदस्या माझ्यावर खासगी हल्ले करण्यासाठी फेक आयडी ट्विटसचा वापर करत आहेत. याचा विरोध म्हणून माझ्या नाराज समर्थकांना खासगी हल्ले सुरू केले तर त्यासाठी मला जबाबदार धरता येणार नाही… अगदी तसंच जसं भाजपला बेकार आयटी सेलसाठी जबाबदार धरता येत नाही’ असं त्यांनी सोमवारी ट्विट केलं होतं.

याआधीही सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पक्षाच्या अनेक धोरणांवर टीका केल्यानं ते चर्चेत आलेले आहेत. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याशिवाय अमित मालवीय यांच्यावर विरोधकांकडूनही खोट्या बातम्या आणि माहिती प्रसारित करण्याची टीका करण्यात आलीय. अमित मालवीय यांना पक्षातून हटवण्यात आलं नाही तर सुब्रह्मण्यम स्वामी काय भूमिका घेणार? याकडेही अनेकांचं लक्ष लागलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment