मुंबई । भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhonsale) यांनी आज बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची (CM Uddhav Thackeray) त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मात्र, या भेटीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांत उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजतेय.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता. तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही उदयनराजे यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य उदयनराजे यांनी मध्यंतरी केले होते. राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता. गेल्याच आठवड्यात उदयनराजेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.