मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे अधिक आक्रमक झाले आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर खालील ५ प्रमुख प्रश्न उपस्थित केल्याचे समजते.
१) जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का?
२)जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का ?
३)ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवल तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ?
४)महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल.
५)MPSC च्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही?
दरम्यान, मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी मध्यंतरी केले होते. राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता. गेल्याच आठवड्यात उदयनराजेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.